औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीतील राजकारणाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. निवडणुकीच्या काळात नको तितके गप्प असलेले खैरे आता बोलू लागलेत. त्यामुळे आचारसंहितेत वादळापूर्वीची शांतता का, असे बोलले जाते.
खैरेंच्या आरोप-प्रत्यारोपांना नंतर आता सवाल विचारला जात आहे. जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या विजयासाठी खोतकरांना गप्प करीत उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली होती. मग खैरेसाठी औरंगाबादेत मध्यस्थी का होऊ शकली नाही ?
लोकसभा निवडणुकीत खासदार चंद्रकांत खैरे एकाकी पडल्याचे चित्र जिल्ह्याने पाहिले. आपलेच लोक फितूर होताना पाहणे त्यांच्या नशिबी आले. स्वपक्षातील नेत्यांनी, मित्रपक्ष भाजपातील अनेकांनी हिशोब बरोबर केल्याचे बोलले जाते. त्यामुळेच मतदानाची बूथ निहाय आकडेवारी जाहीर होताच खैरेंना पराभव तर दिसत नाही ना, असेही लोक बोलू लागलेत. बारामतीकरांनी ज्याप्रमाणे ईव्हीएमवर संशय घेतला. त्याप्रमाणेच आपल्या पराभवाचे खापर फोडण्यासाठी खैरेंनी जागा शोधली, असा कयास लावला जात आहे. निवडणुकीच्या काळात ज्यांनी राजकारण जवळून बघितले. त्यांना निकालाचा अंदाज कधीचाच आला. गेल्या दोन-तीन वर्षात खैरेंनी पक्ष दावणीला बांधल्याचा आरोप होत आहे. सेनेचे फायरब्रँड नेते तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांना हटवण्यासाठी खैरेंनी थेट मातोश्री गाठले. खैरे पालकमंत्री कदम यांना विरोध करीत असताना पालकमंत्री रामदास कदम- इम्तियाज जलील यांची दोस्ती शहराने पाहिली. स्वपक्षातील नेत्यांना अंगावर घेण्याचा फटका खैरेंना बसू शकतो. मित्रपक्ष भाजपलाही शहर ताब्यात घेण्याची घाई झाली आहे. भाजप नेत्यांची फळीच शहरात काम करत असताना खैरे एकटेच किल्ला लढवत होते. लोकसभा निवडणुकी पूर्वी किमान वर्षभर तरी खैरेंनी ग्राउंड बनवायला हवे होते, मात्र तसे झाले नाही. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजप आपल्याला निवडून आणेलच या भरवशावर खैरे राहिले अन अडचणीत आले असेही बोलले जाते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची शहरावर अधिराज्य गाजविण्याची सुप्त इच्छा लपून राहिलेली नाही. जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य निवडून आणणे आणि मनपात सेनेचे वर्चस्व कमी करणे या दोन गोष्टी दानवे यांनी करून दाखविल्या. लोकसभेत सेना हरली तर त्याचे खापर भाजपवरच फुटणार यात शंका नाही. मात्र, त्यामुळे युतीला तडा जाईल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण खोतकर यांच्या बंडासाठी थेट उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी होते, हर्षवर्धन जाधव यांच्या प्रकरणात उद्धव ठाकरे मध्यस्थी करीत नाहीत, यावरून मातोश्रीच्या मनात काय चाललंय हे लक्षात येईल. म्हणूनच खैरे एकाकी पडले की त्यांना एकाकी पाडण्यात आले, हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे.